जत/प्रतिनिधी :
‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत उत्कृष्ट कामगिरी करत वाळेखिंडी ग्रामपंचायतीने राज्यात तिसरा क्रमांक पटकावला असून, १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त सांगली येथील पोलिस परेड ग्राऊंडवर त्यांचा गौरव करण्यात आला.
या समारंभात महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सरपंच सौ. हिंगमिरे व ग्रामपंचायत अधिकारी एम. बी. शिलेदार यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी मौनक घोष (जिल्हाधिकारी), मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
वाळेखिंडी ग्रामपंचायतीने पर्यावरण संवर्धन, स्वच्छता आणि शाश्वत विकासाच्या उपक्रमांत केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे हा मान मिळाला आहे. या यशाबद्दल गावातील सरपंच व ग्रामपंचायत प्रशासनाचे सर्वत्र कौतुक होत आहे. ग्रामस्थांनीही या यशाबद्दल समाधान व्यक्त करत, भविष्यातही अशाच उपक्रमांद्वारे गावाचा विकास साधण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

