जत/प्रतिनिधी :
अध्यात्मासोबत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा अनोखा उपक्रम संख येथील बाबा आश्रमात राबविण्यात येत असून येथे अखंड हरिनाम सप्ताह आणि विविध धार्मिक कार्यक्रमांना प्रारंभ झाला आहे. चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती हभप तुकाराम बाबा महाराज यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला भाविकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
विजयपूर येथील प. पू. सिद्धेश्वर महास्वामी यांनी संख येथील बाबा आश्रमाला भेट दिली. यावेळी त्यांच्या हस्ते आश्रम परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. “झाडे वाढली पाहिजेत आणि जगली पाहिजेत” हा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी तुकाराम बाबा महाराज सातत्याने प्रयत्नशील असतात. अध्यात्म आणि पर्यावरण संवर्धन यांची सांगड घालत त्यांनी या उपक्रमातून समाजात जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे.
प. पू. सिद्धेश्वर महास्वामी यांनी लावलेल्या वृक्षाच्या स्मरणदिनानिमित्त तसेच श्री संत सयाजी बागडेबाबा यांच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त आश्रमात १६ मेपासून अखंड हरिनाम सप्ताह सुरू करण्यात आला आहे. सप्ताहादरम्यान कीर्तन, भजन, प्रवचन आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून भाविकांची मोठी गर्दी होत आहे.
येत्या २० मे रोजी वृक्षपूजनाचा विशेष कार्यक्रम होणार असून २१ मे रोजी सप्ताहाची सांगता करण्यात येणार असल्याची माहिती हभप तुकाराम बाबा महाराज यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नानजीभाई खिमाजीभाई ठकर (ठाणावाला) उपस्थित राहणार आहेत.
या धार्मिक व सामाजिक उपक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन सिद्राया मोरे, संजय धुमाळ, अमृत पाटील, दादा काटे महाराज, समर्थ राठोड महाराज, रामदास भोसले, लिवगौडा भोसले, चनाप्पा आवटी, दत्ता साबळे, पिंटू मोरे, बसू बिराजदार, जयदीप माने, विशाल राठोड आदींनी केले आहे.

