yuva MAharashtra जतमध्ये बांधकाम कामगार साहित्य वाटपासाठी लाभार्थ्यांची दिवसभर प्रतीक्षा; रात्री उशिरापर्यंत थांबविल्याने नाराजी; लाभार्थ्यांना वेठीस धारल्याचा प्रकार

जतमध्ये बांधकाम कामगार साहित्य वाटपासाठी लाभार्थ्यांची दिवसभर प्रतीक्षा; रात्री उशिरापर्यंत थांबविल्याने नाराजी; लाभार्थ्यांना वेठीस धारल्याचा प्रकार

जत वार्ता न्यूज
By -

सुरक्षा संच वाटपावेळी गोंधळ; नियोजनाच्या अभावावर प्रश्नचिन्ह


जत/प्रतिनिधी : 
     महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत बांधकाम कामगारांना देण्यात येणाऱ्या सुरक्षा संच व अत्यावश्यक साहित्याच्या वाटपावेळी जत येथे मोठा गोंधळ उडाल्याचा प्रकार समोर आला आहे. पंचायत समितीच्या नूतन इमारत बांधकामाच्या भूमिपूजन कार्यक्रमानंतर लाभार्थ्यांना साहित्य वाटप करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, लाभार्थ्यांना सकाळपासून बोलावूनही प्रत्यक्ष वाटप रात्री उशिरापर्यंत सुरू राहिल्याने कामगारांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
     जत येथे आयोजित पंचायत समितीच्या नूतन प्रशासकीय इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमास ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि आमदार गोपीचंद पडळकर उपस्थित होते. कार्यक्रमानंतर मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना साहित्य वाटप होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. त्यामुळे तालुक्यातील विविध भागांतून मोठ्या संख्येने बांधकाम कामगार सकाळपासूनच कार्यक्रमस्थळी दाखल झाले होते.
     लाभार्थ्यांची संख्या जवळपास दिड हजारांपर्यंत पोहोचल्याने साहित्य वितरणावेळी मोठी गर्दी झाली. पुरेशा नियोजनाअभावी लाभार्थ्यांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागली. अनेकांना रात्री दहा नंतर साहित्य मिळाले नसल्याची चर्चा होती. महिलांसह ज्येष्ठ कामगारांनाही गैरसोयीला सामोरे जावे लागल्याचे सांगण्यात आले.
     सुरक्षा संच आणि आवश्यक साहित्य मिळणार असल्याने लाभार्थी मोठ्या अपेक्षेने आले होते. मात्र दिवसभर प्रतीक्षा, वाढती गर्दी आणि वितरणातील गोंधळामुळे अनेक कामगारांनी नाराजी व्यक्त केली. काहींनी प्रशासनाने योग्य नियोजन केले असते तर लाभार्थ्यांची गैरसोय टळली असती, अशी प्रतिक्रिया दिली.
     दरम्यान, शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ खऱ्या अर्थाने कामगारांपर्यंत पोहोचविताना वितरण प्रक्रियेत अधिक शिस्तबद्ध नियोजन करण्याची गरज असल्याची चर्चा उपस्थितांमध्ये रंगली.