कचरा व्यवस्थापन, सोलर प्रोजेक्ट, नमो उद्यानासह विविध विकासकामांना वेग
जत/प्रतिनिधी :
जत शहराच्या पाणीपुरवठा आणि कचरा व्यवस्थापनाबाबत नागरिकांमध्ये मुद्दाम असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप नगराध्यक्ष डॉ. रवींद्र आरळी यांनी केला. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली शहरात ७९ कोटी रुपयांची नवीन पाणीपुरवठा योजना प्रगतीपथावर असून, भविष्यात शहरातील प्रत्येक नागरिकाला नियमित पाणीपुरवठा करण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
डॉ. आरळी म्हणाले की, शहरातील सध्याची पाईपलाईन सुमारे ४० वर्षे जुनी असून वारंवार गळती व तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे काहीवेळा पाणीपुरवठा उशिरा होतो. मात्र नव्या योजनेचे काम पूर्ण झाल्यानंतर शहरवासीयांना दररोज सुरळीत पाणीपुरवठा होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कचरा डेपोबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, गेल्या आठ वर्षांत पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी कचरा व्यवस्थापनाकडे पूर्ण दुर्लक्ष केले होते. नगरपालिकेचा कारभार हाती घेतल्यानंतर बंद पडलेली मशिनरी पुन्हा सुरू करण्यात आली असून आता दररोज प्लास्टिक व्यवस्थापन आणि कचरा विघटनाची प्रक्रिया सुरू आहे. याच पाच एकर जागेवर लवकरच सोलर प्रोजेक्ट उभारण्याचे नियोजन असल्याची माहितीही त्यांनी दिली.
शहरातील विविध विकासकामांचा उल्लेख करताना डॉ. आरळी यांनी सांगितले की, लिंगायत स्मशानभूमीचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लावण्याचे काम सुरू आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी डिजिटल अभ्यासिका, एक कोटी रुपयांचे ‘नमो उद्यान’ तसेच इतर मूलभूत सुविधा उभारण्याची कामे युद्धपातळीवर सुरू करण्यात आली आहेत.
आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली जत नगरपालिकेचा चेहरामोहरा बदलत आहे. आगामी काळात जत शहराचा विकास महाराष्ट्रात आदर्श म्हणून ओळखला जाईल, असा विश्वास डॉ. रवींद्र आरळी यांनी व्यक्त केला.
यावेळी नगरसेवक गौतम ऐवळे, परशुराम मोरे, मिथुन भिसे, फिरोज नदाफ, प्रमोद हिरवे, संतोष पटणशेट्टी आदीजन उपस्थित होते.

