लाभ क्षेत्रातील प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पाणी पोहोचविण्याच्या दिल्या सूचना
जत/प्रतिनिधी;
जत तालुक्यात सध्या तीव्र उन्हाळा आणि वाढत्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या पाणी वितरणाबाबत शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त होत आहे. अनेक गावांपर्यंत पाणी पोहोचत नसल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत असल्याने आज जत येथे खासदार विशाल पाटील व माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेऊन परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी शेतकऱ्यांकडून आलेल्या विविध तक्रारी ऐकून घेत त्यांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या.
बैठकीदरम्यान दोड्डानाला परिसरात अद्याप म्हैसाळ योजनेचे पाणी पोहोचले नसल्याची गंभीर तक्रार शेतकऱ्यांनी मांडली. तसेच उमदी भागातील विठ्ठलवाडी, उमदीपर्यंत पाणी पोहोचण्यापूर्वीच पाणीपुरवठा बंद करण्यात आल्याने अनेक शेतकऱ्यांची पिके धोक्यात आली असल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली. शेवटच्या टोकावरील गावांना व शेतकऱ्यांना पुरेसे पाणी मिळत नसल्याने मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण झाल्या असून प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
यावर खासदार विशाल पाटील यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दांत सूचना देत म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या लाभ क्षेत्रातील कोणताही शेतकरी पाण्यापासून वंचित राहता कामा नये, असे सांगितले. पाणी वितरण करताना नियोजनबद्ध पद्धतीने शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचविण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांनी पार पाडावी तसेच ज्या भागांमध्ये पाणी पोहोचले नाही त्या भागांना प्राधान्य देऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, असे निर्देश त्यांनी दिले.
यावेळी खा. पाटील यांनी सध्याची दुष्काळजन्य परिस्थिती आणि उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेता शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. भूगर्भातील पाणीपातळी मोठ्या प्रमाणात घटली असून अनेक विहिरी आणि बोअर कोरड्या पडण्याच्या स्थितीत आहेत. त्यामुळे शेतीसह पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर बनत चालला आहे. अशा परिस्थितीत म्हैसाळ योजनेचे पाणी हेच शेतकऱ्यांसाठी मोठे आधार ठरत असल्याने पाणी वितरणात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
शेतकऱ्यांनीही आपल्या भावना व्यक्त करत पाण्याअभावी द्राक्ष, ऊस, भाजीपाला, फळबागा आणि इतर पिकांचे मोठे नुकसान होत असल्याचे सांगितले. अनेक ठिकाणी जनावरांच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण झाला असून प्रशासनाने तातडीने योग्य नियोजन करून नियमित पाणीपुरवठा करावा, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी माजी आमदार तथा सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विक्रमसिंह सावंत यांनी देखील शेतकऱ्यांच्या समस्या अधिकाऱ्यांसमोर मांडत लाभ क्षेत्रातील सर्व गावांना न्याय मिळावा, अशी मागणी केली. पाणी वितरणामध्ये पारदर्शकता ठेवून शेवटच्या घटकापर्यंत पाणी पोहोचणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
या बैठकीस प्रांताधिकारी अजयकुमार नष्टे, तहसीलदार प्रविण धानोरकर, म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे अधिकारी गडदे साहेब, अजिंक्य जाधव यांच्यासह तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

