yuva MAharashtra जयंतीचा जल्लोष अन् उद्यानाची दुरवस्था; अहिल्यादेवी होळकर उद्यानाकडे जत नगरपरिषदेचे दुर्लक्ष?

जयंतीचा जल्लोष अन् उद्यानाची दुरवस्था; अहिल्यादेवी होळकर उद्यानाकडे जत नगरपरिषदेचे दुर्लक्ष?

जत वार्ता न्यूज
By -

स्वच्छता, देखभाल आणि रोषणाईअभावी नागरिकांत नाराजी


जत/प्रतिनिधी :
     एकीकडे पुण्यश्लोक राजमाता राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त जत शहरात मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असताना दुसरीकडे त्यांच्या नावाने उभारण्यात आलेल्या उद्यानाची दयनीय अवस्था समोर आल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे.
     जत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त भव्य शामियाना, आकर्षक विद्युत रोषणाई तसेच विविध सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शहरात सर्वत्र उत्सवी वातावरण निर्माण झाले असताना काही अंतरावर असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उद्यानाकडे मात्र जत नगरपरिषदेने दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
     लाखो रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या या उद्यानामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात काटेरी झाडे वाढली असून स्वच्छतेचा अभाव जाणवत आहे. उद्यान परिसर अस्वच्छ झाल्याने नागरिक आणि बालकांनाही येथे फिरण्यासाठी अडचणी निर्माण होत असल्याचे सांगितले जात आहे.
     विशेष म्हणजे, दोन दिवसांवर जयंती येऊन ठेपली असतानाही उद्यानाची स्वच्छता, देखभाल किंवा रोषणाईची कोणतीही कामे करण्यात आलेली नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. जयंतीपूर्वी उद्यानाची साफसफाई करून परिसर सुशोभित करणे आवश्यक होते, मात्र नगरपरिषदेने याकडे दुर्लक्ष केल्याची भावना व्यक्त होत आहे.
     एकीकडे अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा गौरव करत मोठ्या प्रमाणावर जयंती साजरी केली जात असताना त्यांच्या नावाच्या उद्यानाची अशी उपेक्षा होणे दुर्दैवी असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत. नगरपरिषद प्रशासनाने तातडीने उद्यानाची स्वच्छता व देखभाल करून नागरिकांसाठी उद्यान सुस्थितीत उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी होत आहे.