नगरसेवक परशुराम मोरे यांच्या पुढाकाराचे शहरभर कौतुक; नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद
जत/प्रतिनिधी;
जत शहरात गेल्या महिनाभरापासून स्वछता मोहीम राबविणाऱ्या जागर फाउंडेशनच्या कार्याला नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत असून, संस्थापक तथा नगरसेवक परशुराम मोरे यांच्या पुढाकाराचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे. अशातच पुण्यश्लोक राजमाता राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या नावाने उभारण्यात आलेल्या उद्यानाची स्वच्छता करून जागर फाउंडेशनने सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले.
अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त शहरात विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असताना दुसरीकडे लाखो रुपये खर्चून उभारलेल्या अहिल्यादेवी उद्यानाची दयनीय अवस्था नागरिकांच्या निदर्शनास येत होती. उद्यान परिसरात मोठ्या प्रमाणात काटेरी झाडे वाढली होती, तसेच स्वच्छतेचा अभाव असल्याने नागरिक व लहान मुलांना उद्यानाचा वापर करताना अडचणींचा सामना करावा लागत होता. जयंतीच्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाकडून उद्यानाची स्वच्छता करणे गरजेचे असताना याकडे पालिका प्रशासनाकडून मात्र दुर्लक्ष झाल्याचे दिसून आले.
या परिस्थितीची दखल घेत जागर फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी उद्यान परिसरात स्वच्छता मोहीम राबवून काटेरी झाडे हटवित, कचरा साफ करून परिसर स्वच्छ केला. या उपक्रमामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, शहराच्या सौंदर्यात भर घालणारा हा उपक्रम असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.
यावेळी बोलताना नगरसेवक परशुराम मोरे म्हणाले की, नागरिकांच्या मागणीनुसार आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली आहे. भविष्यातही अशाच प्रकारे शहरातील सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ व सुस्थितीत ठेवण्यासाठी जागर फाउंडेशन सातत्याने काम करत राहील.
या मोहिमेत नगरसेवक अरुण साळे, सिद्धेश्वर जाधव, गोपाल पाथरूट यांच्यासह फाउंडेशनचे कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले होते.
स्वच्छता मोहिमेवरून राजकीय चर्चांना उधाण;
जागर फाउंडेशनच्या स्वच्छता मोहिमेला शहरातील काही भाजप नगरसेवकांकडून विरोध होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. काही नगरसेवक स्वतंत्र गट स्थापन करून स्वच्छता मोहिमेत उतरतील, अशीही चर्चा सुरू आहे.
या चर्चेबाबत प्रतिक्रिया देताना नगरसेवक परशुराम मोरे यांनी, शहराच्या स्वच्छतेसाठी कोणताही राजकीय भेदभाव न ठेवता सर्वांनी एकत्र येणे आवश्यक असल्याचे सांगितले. "अधिकाधिक सामाजिक कार्यकर्ते, स्वच्छता दूत आणि लोकप्रतिनिधींनी या मोहिमेत सहभागी व्हावे. त्यामुळे शहरातील कचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी होईल आणि जत शहर अधिक स्वच्छ व सुंदर बनण्यास मदत होईल," असे आवाहन त्यांनी केले.
नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या स्वच्छतेच्या प्रश्नावर सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

