yuva MAharashtra मंत्री रामदास आठवले उद्या जत दौऱ्यावर; डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी मागणी करणार; संजय कांबळे

मंत्री रामदास आठवले उद्या जत दौऱ्यावर; डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी मागणी करणार; संजय कांबळे

जत वार्ता न्यूज
By -

जत/प्रतिनिधी : 
     विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी ५ मार्च १९३४ रोजी जत येथे बौद्ध परिषद घेतलेल्या ऐतिहासिक स्थळाला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले भेट देणार असून त्या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभारण्याची मागणी करण्यात येणार असल्याची माहिती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र सहसचिव संजय कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
     संजय कांबळे म्हणाले की, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे शनिवार दि. ३० मे रोजी जत तालुक्याच्या दौऱ्यावर येत आहेत. दुपारी ३ वाजता जत शहरात त्यांचे जंगी स्वागत करण्यात येणार असून शहरात विविध ठिकाणी स्वागत कमानी आणि फ्लेक्स लावण्यात आले आहेत.
     यानंतर दुपारी ३ वाजता विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, जत येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ५ मार्च १९३४ रोजी भेट दिलेल्या ऐतिहासिक स्थळाची पाहणी करण्यात येणार आहे. त्या ठिकाणी स्मारक उभारणीसंदर्भात चर्चा होणार असल्याची माहितीही देण्यात आली.
     दरम्यान, पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेऊन पक्षाच्या ध्येयधोरणांवर चर्चा केली जाणार आहे. तसेच जत तालुक्यातील येळवी येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या नामफलकाचे उद्घाटन रामदास आठवले यांच्या हस्ते होणार असल्याचेही सांगण्यात आले.
      या दौऱ्यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे, प्रदेश सचिव तथा माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात, पश्चिम महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष नानासाहेब वाघमारे, युवक जिल्हाध्यक्ष श्वेतपद्म कांबळे, अरविंद कांबळे, पोपट कांबळे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्ष, उपाध्यक्ष आणि पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याचे संजय कांबळे यांनी सांगितले.