जत/प्रतिनिधी :
बनाळी ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित सन्मान सोहळा व गुणवंत विद्यार्थी गौरव कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला तसेच दहावी व बारावी बोर्ड परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी तसेच रयत शिक्षण संस्थेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांचा ग्रामपंचायतीच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला. तसेच बनाळी ग्रामपंचायतीच्या नूतन सदस्यपदी निवड झाल्याबद्दल विजय देवकर यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बनाळीच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल डॉ. ज्ञानेश्वर माळी यांचाही गौरव करण्यात आला.
याच कार्यक्रमात इयत्ता बारावी आणि दहावी बोर्ड परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. बारावी परीक्षेत श्रेया सावंत हिने सांगली जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवत गावाचे नाव उज्ज्वल केले. तसेच अनुजा परमाळ, साक्षी पाटील, साक्षी कुंभार आणि दिया तूपसौंदर्य या विद्यार्थिनींचाही गौरव करण्यात आला.
दहावी परीक्षेत अदिती कलंगडी हिने जत तालुक्यात द्वितीय क्रमांक मिळवला. याशिवाय रिद्धी सावंत, सिद्धी सावंत, वैष्णवी पितांबरे आणि सुशांत साळुंखे या विद्यार्थ्यांचाही सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मेहनतीच्या जोरावर मिळवलेले यश प्रेरणादायी असल्याचे सांगितले. शिक्षणासोबत सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातही विद्यार्थ्यांनी पुढे यावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. कार्यक्रमास ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामस्थ, पालक, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

