yuva MAharashtra खैराव गावच्या पोलीस पाटील कांताबाई पाटील यांचा ग्रामस्थांकडून सत्कार

खैराव गावच्या पोलीस पाटील कांताबाई पाटील यांचा ग्रामस्थांकडून सत्कार

जत वार्ता न्यूज
By -

जत/प्रतिनिधी;
     जत तालुक्यातील खैराव येथील पोलीस पाटील सौ. कांताबाई रामचंद्र पाटील यांनी पोलीस पाटील पदावर यशस्वीपणे दहा वर्षांची सेवा पूर्ण केल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
     गावातील सामाजिक, प्रशासकीय व कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत ग्रामस्थांनी मानाचा फेटा बांधून, शाल व श्रीफळ देऊन त्यांचा गौरव केला. यावेळी त्यांचे पती तथा माजी सैनिक रामचंद्र पाटील यांचाही सन्मान करण्यात आला.
     सौ. कांताबाई पाटील यांनी गेल्या दहा वर्षांत पोलीस पाटील पदाची जबाबदारी अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडली. विशेषतः कोरोना महामारीच्या कठीण काळात त्यांनी गावात जनजागृती करत प्रशासनाला मोठे सहकार्य केले. मुंबई, पुणे आदी शहरांतून गावात येणाऱ्या नागरिकांची जिल्हा परिषद शाळेमध्ये क्वारंटाईन व्यवस्था करून त्यांची राहण्याची, जेवणाची व आवश्यक सुविधांची योग्य काळजी घेतली. गावात सुरक्षितता राखत नागरिकांमध्ये धीर निर्माण करण्याचे काम त्यांनी प्रभावीपणे केले.
     त्यांच्या या उत्कृष्ट कार्याची दखल घेत यापूर्वी पोलीस प्रशासनाकडून त्यांना प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात होते. तसेच जत तालुका पोलीस पाटील संघटनेच्या उपाध्यक्षा म्हणूनही त्यांनी संघटनात्मक पातळीवर उल्लेखनीय काम करत पोलीस पाटील बांधवांचे प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत.
     या सत्कार समारंभास खैराव गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, टोणेवाडी गावचे पोलीस पाटील चंद्रकांत पाटील तसेच ग्रामस्थ व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

कोरोना काळात निभावली महत्त्वपूर्ण जबाबदारी;
     कोरोना महामारीच्या संकट काळात पोलीस पाटील सौ. कांताबाई पाटील यांनी गावातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अहोरात्र परिश्रम घेतले. मुंबई, पुणे यांसारख्या शहरांतून गावात येणाऱ्या नागरिकांना जिल्हा परिषद शाळेमध्ये क्वारंटाईन करून त्यांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात त्यांनी पुढाकार घेतला. प्रशासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करून गावात सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी त्यांनी प्रभावी काम केले. त्यांच्या उत्कृष्ट सेवेमुळे पोलीस प्रशासनाकडून त्यांना प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले होते.