yuva MAharashtra माडग्याळ मेंढीच्या राष्ट्रीय मान्यतेसाठी निर्णायक टप्पा; शास्त्रज्ञांचा जत तालुक्यात २५ व २६ मे रोजी विशेष पाहणी दौरा

माडग्याळ मेंढीच्या राष्ट्रीय मान्यतेसाठी निर्णायक टप्पा; शास्त्रज्ञांचा जत तालुक्यात २५ व २६ मे रोजी विशेष पाहणी दौरा

जत वार्ता न्यूज
By -
 

जत/प्रतिनिधी : 
     जत तालुक्याची ओळख बनलेल्या प्रसिद्ध माडग्याळ मेंढीला राष्ट्रीय स्तरावरील स्वतंत्र मान्यता मिळवून देण्याच्या प्रक्रियेला आता निर्णायक वेग आला आहे. भारतीय कृषी अनुसंधान परिषद (ICAR) अंतर्गत राष्ट्रीय पशु आनुवंशिक संसाधन ब्युरो (NBAGR), करनाल, हरियाणा तसेच केंद्रीय मेंढी व लोकर संशोधन संस्थेच्या शास्त्रज्ञांकडून दि. २५ व २६ मे रोजी जत तालुक्यातील निवडक मेंढपाळांच्या माडग्याळ मेंढ्यांची सखोल पाहणी आणि वैज्ञानिक अभ्यास केला जाणार आहे.
     पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाने याबाबत पशुसंवर्धन विभागाला अधिकृत पत्र दिले असून या पाहणीमुळे माडग्याळ मेंढीच्या राष्ट्रीय नोंदणी प्रक्रियेला गती मिळणार आहे.
दुष्काळी भागातील तगडी जात;
     माडग्याळ मेंढीचे मूळ स्थान जत तालुका मानले जाते. कमी पाण्यात आणि दुष्काळी परिस्थितीतही टिकून राहण्याची क्षमता, मजबूत शरीरयष्टी, लांब पल्ल्याच्या स्थलांतराची ताकद तसेच उच्च दर्जाचे मटण उत्पादन यामुळे या जातीची स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे. महाराष्ट्रासह कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील बाजारपेठांमध्ये माडग्याळ मेंढ्यांच्या मटणाला विशेष मागणी असल्याचे सांगितले जाते.
धनगर समाजाच्या परंपरेचा वारसा;
     माडग्याळ मेंढी ही केवळ पशुधन नसून जत तालुक्याच्या सांस्कृतिक आणि आर्थिक जीवनाचा महत्त्वाचा भाग मानली जाते. अनेक पिढ्यांपासून धनगर समाजाने या जातीचे संवर्धन केले आहे. दुष्काळी पट्ट्यातील मेंढपाळ आणि शेतकऱ्यांसाठी ही जात मोठा आधार ठरली आहे.
     अभ्यासकांच्या मते, माडग्याळ मेंढीची राष्ट्रीय नोंदणी झाल्यानंतर या जातीला अधिकृत ओळख मिळेल. त्यामुळे संवर्धनासाठी विशेष शासकीय योजना, संशोधन प्रकल्प, जनुकीय संरक्षण, प्रजनन केंद्रे तसेच मेंढपाळांसाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो.
शास्त्रज्ञांकडून सखोल वैज्ञानिक अभ्यास;
     या पाहणी दौऱ्यात शास्त्रज्ञांकडून मेंढ्यांची शरीररचना, उंची, रंग, आनुवंशिक वैशिष्ट्ये तसेच पालनपद्धतीची माहिती संकलित केली जाणार आहे. त्याचबरोबर रक्त व इतर जैविक नमुने तपासणीसाठी घेण्यात येणार असून त्याच्या आधारे जाती नोंदणीचा अंतिम अहवाल तयार करण्यात येणार आहे.
     या मोहिमेसाठी खैराव, आबाचीवाडी, लकडेवाडी, दरीबडची, कोसारी, रेवनाळ, अचकनहळळी, शेगाव, कुलाळवाडी, बागेवाडी, वळसंग, सिद्धनाथ, मुचंडी आदी गावांतील उच्च गुणवत्तेच्या माडग्याळ मेंढ्या असलेल्या ३६ मेंढीपालकांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या नर व मादी अशा शंभरहून अधिक मेंढ्यांची तपासणी केली जाणार आहे.
     या पाहणीसाठी राष्ट्रीय पशु आनुवंशिक संसाधन ब्युरोचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. महेश डिंगे तसेच केंद्रीय मेंढी व लोकर संशोधन संस्थेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सारवनन सहभागी होणार असल्याची माहिती संबंधित पत्रात देण्यात आली आहे. माडग्याळ मेंढीला राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाल्यास जत तालुक्याच्या पशुधन परंपरेला नवी ओळख मिळणार असून मेंढपाळ समाजासाठी हा ऐतिहासिक टप्पा ठरणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.