yuva MAharashtra मराठा आरक्षणाबाबत सरसकट ओबीसी आरक्षण शक्य नाही : केंद्रीय मंत्री रामदास आठवले

मराठा आरक्षणाबाबत सरसकट ओबीसी आरक्षण शक्य नाही : केंद्रीय मंत्री रामदास आठवले

जत वार्ता न्यूज
By -

गरीब मराठ्यांना आरक्षण देण्यास पाठिंबा; राज्य सरकार मराठा समाजाच्या बाजूने असल्याचा दावा


जत/प्रतिनिधी ;
     मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील यांनी सुरू केलेले आंदोलन योग्य असले, तरी संपूर्ण मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी मान्य होणे अत्यंत कठीण असल्याचे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले. जत तालुक्याच्या दौऱ्यावर असताना पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली.
     आठवले म्हणाले की, मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना आरक्षण मिळावे, ही मागणी रास्त आहे. ज्या मराठा समाजातील कुटुंबांच्या नोंदी कुणबी म्हणून उपलब्ध आहेत, त्यांना विद्यमान नियमांनुसार आरक्षणाचा लाभ मिळण्यास कोणतीही अडचण नसावी. मात्र संपूर्ण मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करून आरक्षण देणे व्यवहार्य नसल्याचे त्यांनी सांगितले.
     राज्य सरकारने मराठा समाजासाठी शिक्षण आणि विविध स्पर्धा परीक्षांमध्ये १० टक्के आरक्षणाची तरतूद केली असून, सारथी संस्थेलाही मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या प्रश्नांबाबत राज्य सरकार सकारात्मक असल्याचा दावा त्यांनी केला.
     मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मराठा समाजाच्या हिताच्या बाजूने ठामपणे उभे आहेत. तसेच भारतीय जनता पक्षात मराठा समाजाचे मोठ्या संख्येने आमदार व खासदार असल्याने मराठा आरक्षणाला भाजपचा विरोध असल्याचे म्हणणे चुकीचे असल्याचेही त्यांनी नमूद केले.
     यावेळी त्यांनी केंद्र सरकारच्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (EWS) असलेल्या आरक्षणाचा उल्लेख केला. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती किंवा ओबीसी प्रवर्गात न येणाऱ्या आणि वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या कुटुंबांना ईडब्ल्यूएस आरक्षणाचा लाभ दिला जात असल्याचे सांगत, मराठा समाजातील पात्र घटकांनी या आरक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
     मराठा समाजाच्या प्रश्नावर राज्य सरकारने सकारात्मक भूमिका घेतली असून आरक्षणाच्या विषयावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचा विश्वासही आठवले यांनी व्यक्त केला.
     यावेळी आरपीआय (आठवले)चे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे, पुण्याचे माजी उपमहापौर परशुराम वाडेकर, जिल्हा कार्याध्यक्ष संजय कांबळे, जितेंद्र बनसोडे, जिल्हा उपाध्यक्ष विकास साबळे, तालुकाध्यक्ष संजय कांबळे-पाटील तसेच पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गरीब मराठ्यांच्या आरक्षणाला माझा पाठिंबा;
     मनोज जरांगे-पाटील यांनी मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना आरक्षण मिळावे या उद्देशाने सुरू केलेले आंदोलन योग्य असल्याचे रामदास आठवले यांनी सांगितले. मात्र ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता आणि कायदेशीर चौकटीत राहूनच आरक्षणाचा प्रश्न सोडवावा लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.