yuva MAharashtra आठवड्यातून एकदाच पाणी, मग करवाढ कशासाठी?; पाणीपट्टीविरोधात सह्यांची मोहीम राबविणार: विक्रम ढोणे

आठवड्यातून एकदाच पाणी, मग करवाढ कशासाठी?; पाणीपट्टीविरोधात सह्यांची मोहीम राबविणार: विक्रम ढोणे

जत वार्ता न्यूज
By -


जत/प्रतिनिधी :

     शहरात आठवड्यातून केवळ एकदाच पाणीपुरवठा होत असताना नगरपरिषदेकडून पाणीपट्टीत वाढ करण्यात आल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. या अन्यायकारक करवाढीविरोधात १ मे महाराष्ट्र दिनापासून सह्यांची मोहीम राबविण्यात येणार असल्याची घोषणा जनप्रभा फाऊंडेशनचे अध्यक्ष विक्रम ढोणे यांनी केली.

     जत नगरपरिषदेच्या स्थापनेला १४ वर्षे पूर्ण होत आली असतानाही मूलभूत सुविधांबाबत नागरिकांची अपेक्षा अपूर्णच असल्याची टीका त्यांनी केली. नव्या अर्थसंकल्पात (२०२६-२७) नगराध्यक्ष डॉ. रवींद्र आरळी यांनी पाणीपट्टीत वाढ प्रस्तावित केल्याने नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत असल्याचे त्यांनी नमूद केले.
     या निर्णयाविरोधात नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व सर्व नगरसेवकांना निवेदन देऊन दरवाढ मागे घेण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र त्यावर कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. “एकीकडे अपुरा पाणीपुरवठा आणि दुसरीकडे करवाढ, हे नागरिकांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे,” अशी टीका ढोणे यांनी केली.
     दरम्यान, या पार्श्वभूमीवर शहरातील विविध भागांत जाऊन नागरिकांच्या स्वाक्षऱ्या गोळा केल्या जाणार असून, त्यानंतर हे निवेदन नगरपरिषद प्रशासनाकडे सादर केले जाईल. जनमताचा आदर राखून पाणीपट्टी वाढीचा निर्णय रद्द करण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी केली.
     शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था सुधारून नियमित सेवा देण्याऐवजी करवाढ करणे हा अन्याय असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत असून, या आंदोलनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.