जत/प्रतिनिधी :
जनतेला महसूल विभागाच्या सेवा अधिक सुलभ, जलद आणि पारदर्शक पद्धतीने उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत जत येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ आयोजित करण्यात आले होते. या शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
शासनाच्या विविध महसुली सेवा नागरिकांना एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याच्या हेतूने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरामध्ये ७/१२ उताऱ्यांतील दुरुस्ती, डिजिटल स्वाक्षरीचे उतारे, उत्पन्न प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, जमीन नोंदीविषयक कामे, बिनशेती (NA) प्रकरणे, ई-मोजणी अर्ज तसेच विद्यार्थ्यांसाठी विविध दाखल्यांचे वाटप अशा अनेक सेवा प्रदान करण्यात आल्या. त्यामुळे नागरिकांची विविध कार्यालयांमध्ये होणारी धावपळ कमी झाली.
या उपक्रमास आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपस्थित राहून नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. शासनाच्या योजना आणि सेवा प्रभावीपणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
सामान्य नागरिकांच्या महसुली विषयक अडचणी तत्काळ मार्गी लावून शासन सेवा गावपातळीपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा हा उपक्रम लोकाभिमुख प्रशासनाचे उत्तम उदाहरण असल्याची भावना उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

