जत | प्रतिनिधी
जत शहरातील युवा नगरसेवक तथा जागर फाऊंडेशनचे संस्थापक परशुराम (भैय्या) मोरे यांना शेगाव येथील ओम साई प्रतिष्ठान यांच्या वतीने प्रतिष्ठेचा “समाजरत्न पुरस्कार २०२५-२६” जाहीर करण्यात आला आहे. त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि जनहिताच्या विविध उपक्रमांची दखल घेत हा सन्मान जाहीर करण्यात आला असून, त्यांच्या निवडीचे सर्व स्तरांतून स्वागत व अभिनंदन केले जात आहे.
ओम साई प्रतिष्ठान, शेगाव ही संस्था गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, सांस्कृतिक, क्रीडा, पर्यावरण तसेच जनजागृती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा गौरव करत आहे. यावर्षीच्या पुरस्कारासाठी परशुराम मोरे यांची निवड करण्यात आली आहे.
जागर फाऊंडेशनच्या माध्यमातून मोरे यांनी जत शहरात स्वच्छता अभियान, सामाजिक उपक्रम, पर्यावरण संवर्धन, नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांबाबत जनजागृती तसेच विविध लोकहिताच्या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदविला आहे. अल्पावधीतच त्यांच्या कार्याची व्यापक दखल घेतली गेली असून, या कार्याची पोहोच आता राज्यस्तरापर्यंत पोहोचल्याचे या पुरस्कारामुळे अधोरेखित झाले आहे.
ओम साई प्रतिष्ठानने पाठविलेल्या निवडपत्रानुसार, पुरस्कार वितरण सोहळा ७ जून २०२६ रोजी सकाळी ११ वाजता त्रिमूर्ती मल्टीपर्पज हॉल, शेगाव येथे आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यात विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत परशुराम मोरे यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
पुरस्कार जाहीर झाल्यानंतर जत शहरासह तालुक्यातील सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांकडून परशुराम मोरे यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. तसेच जागर फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांमध्येही आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सामाजिक उपक्रमांमुळे मिळाली विशेष ओळख;जागर फाऊंडेशनच्या माध्यमातून स्वच्छता मोहीम, पर्यावरण संवर्धन, गरजू नागरिकांना मदत, सामाजिक जनजागृती आणि विविध लोकहिताच्या उपक्रमांमध्ये सातत्याने सहभाग घेत परशुराम मोरे यांनी समाजात वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या याच कार्याची दखल घेत ओम साई प्रतिष्ठानने “समाजरत्न पुरस्कार” जाहीर केल्याने जत तालुक्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

