yuva MAharashtra तालुक्यातील प्रलंबित प्रश्नांसाठी मंगळवारी जतमध्ये घंटानाद आंदोलन | राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी प्रशासकीय भवनासमोर आंदोलन; नागरिकांनी सहभागी व्हावे – विक्रम ढोणे

तालुक्यातील प्रलंबित प्रश्नांसाठी मंगळवारी जतमध्ये घंटानाद आंदोलन | राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी प्रशासकीय भवनासमोर आंदोलन; नागरिकांनी सहभागी व्हावे – विक्रम ढोणे

जत वार्ता न्यूज
By -

जत | प्रतिनिधी : 
     जत तालुक्यातील विविध प्रलंबित आणि ज्वलंत प्रश्नांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी जत येथील प्रशासकीय भवनासमोर घंटानाद आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती युवक नेते विक्रम ढोणे यांनी दिली. पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन आयोजित करण्यात आले असून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
     विक्रम ढोणे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, विकासाच्या दृष्टीने जत तालुका अद्यापही मागासलेला असून अनेक महत्त्वाच्या प्रश्नांकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे. या प्रश्नांबाबत सातत्याने पाठपुरावा करूनही ठोस निर्णय होत नसल्याने घंटानाद आंदोलनाच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
     तालुक्याचे विभाजन ही येथील नागरिकांची अनेक वर्षांपासूनची प्रमुख मागणी आहे. तालुक्याचे क्षेत्रफळ मोठे असल्याने नागरिकांना प्रशासकीय कामांसाठी मोठा प्रवास करावा लागतो. तालुक्याचे विभाजन झाल्यास प्रशासन अधिक प्रभावी होईल आणि नागरिकांची गैरसोय दूर होईल, असे ढोणे यांनी नमूद केले.
     याशिवाय जत उपजिल्हा रुग्णालय तसेच कुंभारी, मुचंडी, जाडर-बोबालद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांची शंभर टक्के पदभरती करून आरोग्य सेवा सक्षम कराव्यात, अशी मागणीही करण्यात येणार आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या आरोग्य सुविधांचा नागरिकांना पुरेसा लाभ मिळण्यासाठी रिक्त पदे तातडीने भरावीत, असेही त्यांनी सांगितले.
     म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या विभागीय कार्यालयाबाबत शासनाने जत येथे कार्यालय सुरू करण्याचा आदेश दिला असला तरी त्याची प्रभावी अंमलबजावणी झालेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासह कृषी विभागाकडील विविध योजनांमधील लाभार्थी शेतकऱ्यांचे प्रलंबित अनुदान तातडीने वितरित करावे, अशी मागणीही आंदोलनातून करण्यात येणार आहे.
     जत शहरात स्वतंत्र वाहतूक शाखा सुरू करणे, ग्रामीण भागातील पोलीस चौक्यांना आवश्यक मनुष्यबळ व सुविधा उपलब्ध करून त्यांना सक्षम करणे, तसेच संख अप्पर तहसील कार्यालयात आवश्यक अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदनिर्मिती करणे या मागण्यांचाही आंदोलनात समावेश करण्यात आला आहे.
     तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नागरिकांच्या मूलभूत समस्यांच्या निराकरणासाठी हे आंदोलन महत्त्वाचे ठरणार असल्याचे सांगत विक्रम ढोणे यांनी सर्वपक्षीय कार्यकर्ते, शेतकरी, युवक, व्यापारी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
प्रमुख मागण्या;
जत तालुक्याचे विभाजन करावे
जत उपजिल्हा रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रांतील रिक्त पदे भरावीत
म्हैसाळ योजनेचे विभागीय कार्यालय पूर्ण क्षमतेने जतमध्ये कार्यान्वित करावे
शेतकऱ्यांचे प्रलंबित कृषी अनुदान तातडीने वितरित करावे
जत शहरात स्वतंत्र वाहतूक शाखा सुरू करावी
ग्रामीण भागातील पोलीस चौक्या सक्षम कराव्यात
संख अप्पर तहसील कार्यालयात आवश्यक पदनिर्मिती करावी