yuva MAharashtra जत पोलिसांची मोठी कारवाई; मोटार व केबल चोरी प्रकरणातील दोघांना अटक, दोघे फरार; २ लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त

जत पोलिसांची मोठी कारवाई; मोटार व केबल चोरी प्रकरणातील दोघांना अटक, दोघे फरार; २ लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त

जत वार्ता न्यूज
By -

जत | प्रतिनिधी : 
     जत पोलिसांनी मोटार व केबल चोरीच्या तीन वेगवेगळ्या गुन्ह्यांचा छडा लावत दोन संशयित आरोपींना अटक केली असून दोन आरोपी फरार आहेत. त्यांच्याकडून सुमारे २ लाख ५ हजार ३८ रुपयांचा चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
     मिळालेल्या माहितीनुसार, जत शहरातील मोरे कॉलनी परिसरातील एका इलेक्ट्रिकल दुकानातून तांब्याच्या वायरची चोरी झाल्याची तक्रार दाखल होती. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी विविध ठिकाणी मोटार, केबल व इतर साहित्य चोरी केल्याची कबुली दिली.
     या प्रकरणी कृष्णा विजय घाडगे (रा. जुना बुधगाव, जि. सांगली), ईरण्णा आप्पासो बिराजदार (रा. कोळगिरी, ता. जत) यांना अटक करण्यात आली आहे. तर सुभाष काळे (रा. सातारा रोड, पारधी तांडा, जत) व निखिल भिसे (रा. माडग्याळ, ता. जत) हे दोघे फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.
     पोलिसांनी आरोपींकडून विविध कंपन्यांच्या तांब्याच्या वायर, मोटारी, स्टार्टर, पेटी तसेच केबल असा एकूण २ लाख ५ हजार ३८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे जत पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या तीन चोरीच्या गुन्ह्यांची उकल झाली आहे.
     ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोषी व उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक बिराप्पा लातूर, पोलीस उपनिरीक्षक विश्वंभर पोटे तसेच पोलीस कर्मचारी संभाजी करांडे, तौहीद मुल्ला, विनोद सकटे, सागर करांडे, नाथा खोत, अजय पाटील, विजय पाटणकर आदींच्या पथकाने केली. पुढील तपास जत पोलिस करत आहेत.