yuva MAharashtra नव्या शैक्षणिक वर्षाचे उत्साहात स्वागत; रामराव विद्यामंदिरात विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्पांनी अभिनंदन | माजी नगरसेविका शारदाताई कुंभार व सामाजिक कार्यकर्ते पापा कुंभार यांचा उपक्रम

नव्या शैक्षणिक वर्षाचे उत्साहात स्वागत; रामराव विद्यामंदिरात विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्पांनी अभिनंदन | माजी नगरसेविका शारदाताई कुंभार व सामाजिक कार्यकर्ते पापा कुंभार यांचा उपक्रम

जत वार्ता न्यूज
By -

जत | प्रतिनिधी :
     जत शहरातील शैक्षणिक क्षेत्रात नावाजलेल्या श्री. रामराव विद्यामंदिर प्राथमिक शाळेत नव्या शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. माजी नगरसेविका सौ. शारदाताई कुंभार आणि सामाजिक कार्यकर्ते तथा शिवनगर व शिवनेरी गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत उर्फ पापा कुंभार यांच्या हस्ते नवोदित विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.
     श्री. रामराव विद्यामंदिर प्राथमिक शाळेची यंदाची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली असून इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत एकूण २२५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. नव्या शैक्षणिक वर्षात प्रथमच शाळेत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे आनंददायी वातावरणात स्वागत करून त्यांच्यात शिक्षणाबद्दल उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
     यावेळी विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचेही वाटप करण्यात आले. शिक्षणासोबत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देणाऱ्या या शाळेत अबॅकस, वैदिक गणित, रंगोत्सव चित्रकला स्पर्धा तसेच टीएसईसारख्या विविध स्पर्धा परीक्षा व उपक्रमांचे नियमित आयोजन केले जाते. गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि उत्कृष्ट शैक्षणिक उपक्रमांमुळे दोन वर्षांपूर्वी या शाळेला आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे. त्यामुळे परिसरातील पालकांचा शाळेवर विशेष विश्वास असल्याचे दिसून येते.
     या कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक पाठक सर, साळे मॅडम, आर. टी. कोळी, बालवाडीच्या मुख्याध्यापिका श्रद्धा शिंदे, शिखरे मॅडम तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आणि आनंददायी ठरल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.