yuva MAharashtra संख येथे आमदार गोपीचंद पडळकर यांचा जनता दरबार; २०० हून अधिक अर्जांवर सुनावणी

संख येथे आमदार गोपीचंद पडळकर यांचा जनता दरबार; २०० हून अधिक अर्जांवर सुनावणी

जत वार्ता न्यूज
By -

जत | प्रतिनिधी :
     जत विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या विविध समस्या, शासकीय कामांचा तातडीने निपटारा आणि प्रशासनाशी थेट संवाद साधण्यासाठी संख येथे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या अध्यक्षतेखाली जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात २०० हून अधिक अर्जांवर सुनावणी करून संबंधित विभागांना त्वरित कार्यवाहीच्या सूचना देण्यात आल्या.
     जनता दरबारात महसूल, वीज, पाणीपुरवठा, रस्ते, शासकीय योजनांचा लाभ, सामाजिक प्रश्न तसेच वैयक्तिक अडचणींसंदर्भातील नागरिकांची निवेदने प्रत्यक्ष ऐकून घेण्यात आली. यावेळी प्रांताधिकारी, अप्पर तहसीलदार तसेच विविध विभागांच्या अधिकाऱ्यांशी समोरासमोर चर्चा करून प्रलंबित प्रकरणांचा लवकरात लवकर निपटारा करण्याचे निर्देश आमदार पडळकर यांनी दिले.
     यावेळी बोलताना आमदार पडळकर म्हणाले, जनतेच्या विश्वासाला पात्र ठरत प्रत्येक नागरिकाच्या प्रश्नाला न्याय मिळवून देणे आणि प्रशासन अधिक उत्तरदायी बनवणे हीच आपली भूमिका आहे. मतदारसंघातील नागरिकांच्या सेवेसाठी आणि सर्वांगीण विकासासाठी माझे प्रयत्न सातत्याने सुरू राहतील.
     या कार्यक्रमास भाजपचे नगराध्यक्ष डॉ. रवींद्र आरळी, सभापती सौ अर्चना पाटील, आर. के. पाटील, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.