yuva MAharashtra जत तालुक्यात पावसाअभावी पेरण्या ठप्प; शेतकरी संकटात, शासनाने तात्काळ उपाययोजना कराव्यात; सुनिल बागडे

जत तालुक्यात पावसाअभावी पेरण्या ठप्प; शेतकरी संकटात, शासनाने तात्काळ उपाययोजना कराव्यात; सुनिल बागडे

जत वार्ता न्यूज
By -

​जत | प्रतिनिधी: 
     मृग नक्षत्र संपून चालू महिना संपत आला, तरीही जत तालुक्यात अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. यामुळे तालुक्यात अजूनही पेरण्या खोळंबल्या असून बळीराजा मोठ्या संकटात सापडला आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत, शासनाने तात्काळ जत तालुक्यात उपाययोजना सुरू कराव्यात, अशी मागणी प्रहार संघटनेचे जत तालुकाध्यक्ष सुनिल बागडे यांनी केली आहे.
      ​दरवर्षी जूनच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यात तालुक्यात पेरण्यांची लगबग सुरू असते. मात्र यंदा पावसाने पूर्णपणे पाठ फिरवल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. पावसाअभावी खते आणि बियाणे खरेदी करून ठेवलेला शेतकरी चिंतेत पडला असून, आधीच आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांसमोर आता दुबार पेरणीचे आणि जनावरांच्या चार्‍याचे मोठे संकट उभे ठाकले आहे.
​जत तालुका हा नेहमीच दुष्काळाच्या छायेत असतो. यंदा पाऊस लांबल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. पेरण्या न झाल्यामुळे खरीप हंगाम वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. प्रहार संघटना नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आहे. जर पुढील काही दिवसांत प्रशासनाने शेतकऱ्यांना दिलासा देणारे ठोस निर्णय घेतले नाहीत, तर प्रहार स्टाईलने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सुनिल बागडे यांनी दिला आहे.

​प्रहार संघटनेच्या वतीने प्रशासनाकडे प्रमुख मागण्या:
१) ​तालुक्यात तात्काळ दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करून उपाययोजना सुरू कराव्यात.
२)​ज्या शेतकऱ्यांनी बँकेकडून कर्ज घेतले आहे, त्यांच्या कर्जवसुलीस स्थगिती द्यावी.
३)​जनावरांसाठी चारा छावण्या किंवा चारा डेपोचे नियोजन आत्तापासूनच सुरू करावे.
४)​म्हैसाळ योजनेचे पाणी तात्काळ जतच्या वंचित भागातील तलावांमध्ये सोडून शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटवावा. 
​जत तालुक्यातील शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी प्रहार संघटना शेवटपर्यंत लढा देईल, असे मत सुनिल बागडे यांनी यावेळी व्यक्त केले.