देशभरातील १५०० हून अधिक केंद्रांवर योग शिबिरे; सांगली सेक्टरमधील विविध ठिकाणी विशेष आयोजन
‘निरोगी शरीर, निर्मळ मन आणि सजग आत्मा’ या संदेशाचा प्रसार करत संत निरंकारी मिशनच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त देशभर व्यापक योग व आध्यात्मिक चेतना अभियान राबविण्यात येणार आहे. सतगुरु माता सुदीक्षा जी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात येणारा हा उपक्रम मानवकल्याण, समग्र आरोग्य आणि आध्यात्मिक उन्नतीला चालना देणारा ठरणार आहे.
सतगुरु माता सुदीक्षा जी महाराज यांनी ‘स्वस्थ मन, सहज जीवन’ या संकल्पनेवर भर देताना शारीरिक आरोग्यासोबत मानसिक संतुलन आणि आध्यात्मिक जागरूकतेचे महत्त्व अधोरेखित केले आहे. मानवी शरीर ही परमात्म्याची अमूल्य देणगी असून त्याची योग्य काळजी घेतल्यास व्यक्ती आपल्या सामाजिक, मानवी आणि आध्यात्मिक जबाबदाऱ्या अधिक प्रभावीपणे पार पाडू शकते, असा संदेश त्यांनी दिला आहे.
या पार्श्वभूमीवर रविवार, २१ जून २०२६ रोजी सकाळी ६ वाजता देशभरातील १५०० हून अधिक संत निरंकारी मिशन केंद्रांवर एकाच वेळी योग शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. स्थानिक योग प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विविध उद्याने आणि मोकळ्या मैदानांमध्ये होणाऱ्या या शिबिरांमध्ये श्रद्धाळू, सेवादल स्वयंसेवक तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
यंदाच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केलेली ‘स्वस्थ जीवनासाठी योग’ ही संकल्पना समाजाला शारीरिक, मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिक आरोग्याचा समतोल साधण्याचा संदेश देते. संत निरंकारी मिशन योगाला केवळ व्यायाम न मानता आत्मबोध, अंतर्मनाची शांतता, मानव एकता आणि विश्वबंधुत्वाची भावना जागृत करणारे जीवनमूल्य मानते.
संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने सांगली सेक्टरअंतर्गत मिरज, नरवाड, देशिंग, सलगरे, कवठेमहांकाळ आणि जत येथे सकाळी ७ ते ९ या वेळेत योग दिनाचे विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती झोनल इन्चार्ज नंदकुमार झांबरे आणि संयोजक जालिंदर जाधव यांनी दिली.
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत सर्वांगीण आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करून प्रत्येक व्यक्तीने योगाला आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवावे, हा या अभियानामागील मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले. योगाच्या माध्यमातून निरोगी, संतुलित, ऊर्जावान आणि आनंदी जीवनाकडे वाटचाल करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

