गुड्डापूर येथे विशेष प्रार्थना; १००१ झाडे लावण्याचा संकल्प, श्रद्धा आणि पर्यावरण संवर्धनाचा अनोखा संगम
महाराष्ट्रासह जत तालुक्यात समाधानकारक पाऊस व्हावा, दुष्काळाचे संकट दूर व्हावे आणि संपूर्ण परिसर हिरवागार व्हावा, या उद्देशाने चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती तथा श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे संस्थापक हभप तुकाराम बाबा महाराज यांनी विशेष धार्मिक उपक्रमाचे आयोजन केले आहे. मंगळवारी सकाळी १० वाजता जत तालुक्यातील गुड्डापूर येथील प्रसिद्ध श्री दानम्मा देवी मंदिरात विशेष प्रार्थना करून मंदिराभोवती लोटांगण घालत वरुणराजाला साकडे घालण्यात येणार आहे.
महाराष्ट्र आणि कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री दानम्मा देवीच्या चरणी हा धार्मिक संकल्प करण्यात येणार असून राज्यातील दुष्काळी परिस्थिती दूर होऊन सर्वत्र समाधानकारक पाऊस पडावा, अशी प्रार्थना करण्यात येणार आहे. यंदा मान्सूनने अनेक भागांत अपेक्षित हजेरी न लावल्याने शेतकरी वर्ग चिंतेत आहे. पावसाअभावी खरीप हंगाम संकटात सापडला असून पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही अनेक ठिकाणी गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर एक पाऊल पावसासाठी, देवाच्या चरणी या संकल्पनेतून तुकाराम बाबा महाराजांनी हा उपक्रम हाती घेतला आहे.
यावेळी देवीसमोर सामूहिक प्रार्थना, विशेष पूजन आणि धार्मिक विधी आयोजित करण्यात येणार आहेत. धार्मिक परंपरा आणि लोकभावना यांचा सन्मान राखत वरुणराजाला प्रसन्न करण्यासाठी विशेष साकडे घालण्यात येणार असल्याची माहिती तुकाराम बाबा महाराज यांनी दिली.
विशेष म्हणजे या धार्मिक कार्यक्रमाला पर्यावरण संवर्धनाची जोड देण्यात आली आहे. "देवासोबत निसर्गालाही हाक" या संदेशातून गुड्डापूर परिसरासह तालुक्यात १००१ वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आला आहे. वाढते तापमान, बदलते हवामान आणि पावसाच्या अनिश्चित चक्रामुळे वृक्षसंवर्धनाची गरज अधिक अधोरेखित होत असल्याचे तुकाराम बाबा यांनी सांगितले.
ते म्हणाले, केवळ पावसासाठी प्रार्थना करून चालणार नाही, तर पर्यावरण संतुलनासाठी प्रत्येकाने वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धनाची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. निसर्गाचे रक्षण केल्यासच भविष्यातील पिढ्यांना सुरक्षित पर्यावरण मिळू शकते.
सामाजिक, आध्यात्मिक आणि पर्यावरणीय जाणीवांचा संगम घडवून आणणारा हा उपक्रम समाजात सकारात्मक संदेश देणारा ठरणार असल्याची भावना व्यक्त होत आहे. श्रद्धा, पर्यावरण संरक्षण आणि सामाजिक एकात्मता यांचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले. या विशेष धार्मिक व पर्यावरण जनजागृती उपक्रमात भाविक, पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन हभप तुकाराम बाबा महाराज यांनी केले आहे.
उपक्रमाची वैशिष्ट्ये -श्री दानम्मा देवी मंदिरात विशेष प्रार्थनामंदिराभोवती लोटांगण घालून वरुणराजाला साकडेमहाराष्ट्रातील दुष्काळ निवारणासाठी सामूहिक प्रार्थना१००१ वृक्ष लागवडीचा संकल्पपर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृतीश्रद्धा, निसर्ग आणि सामाजिक बांधिलकीचा संगम"पाऊस हवा असेल तर निसर्ग वाचवावा लागेल, आणि निसर्ग वाचवायचा असेल तर वृक्ष लागवड हा एकमेव प्रभावी मार्ग आहे," असा संदेश या उपक्रमातून दिला जाणार आहे.

