yuva MAharashtra जतमध्ये तुंबलेल्या गटारींचा प्रश्न गंभीर; वृद्धाला स्वतःच उतरावे लागले स्वच्छतेसाठी

जतमध्ये तुंबलेल्या गटारींचा प्रश्न गंभीर; वृद्धाला स्वतःच उतरावे लागले स्वच्छतेसाठी

जत वार्ता न्यूज
By -

छत्रपती संभाजी चौक परिसरातील प्रकार; पालिका प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नागरिकांकडून प्रश्नचिन्ह

जत | प्रतिनिधी : 
     शहरातील छत्रपती संभाजी चौक परिसरात तुंबलेल्या गटारामुळे साचलेल्या सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने एका वृद्ध नागरिकाला स्वतः गटार स्वच्छ करण्यासाठी पुढाकार घ्यावा लागल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे शहरातील स्वच्छता व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, नगरपालिकेच्या कार्यपद्धतीबाबत नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
     मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित वृद्ध व्यक्ती आपल्या घराशेजारील गटारातील कचरा आणि गाळ काढून पाण्याचा निचरा सुरळीत करण्याचा प्रयत्न करत असल्याचे परिसरातील नागरिकांच्या निदर्शनास आले. गटार तुंबल्यामुळे सांडपाणी साचत असून दुर्गंधी, डासांचा प्रादुर्भाव तसेच आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
     नागरिकांच्या म्हणण्यानुसार, शहरातील अनेक भागांमध्ये गटारी नियमितपणे साफ केल्या जात नसल्याने अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी नागरिकांनाच स्वतः गटारी स्वच्छ करण्याची वेळ येत आहे. विशेषतः पावसाळ्यात ही समस्या अधिक गंभीर होत असून, सांडपाण्याचा निचरा न झाल्याने रस्त्यांवर पाणी साचते आणि नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागते.
     पालिकेकडून नियमित स्वच्छता मोहीम, गटारांची वेळेवर साफसफाई आणि देखभाल करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. छत्रपती संभाजी चौकातील हा प्रकार केवळ एका वृद्ध व्यक्तीच्या संघर्षाचे चित्र नसून शहरातील स्वच्छता व्यवस्थेतील त्रुटी अधोरेखित करणारा असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.
     या पार्श्वभूमीवर जत नगरपालिकेने तुंबलेल्या गटाऱ्यांची तातडीने साफसफाई करून शहरातील स्वच्छता व्यवस्थेत सुधारणा करावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. अन्यथा प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत आहे का, असा सवालही नागरिक उपस्थित करत आहेत.