सांगली | प्रतिनिधी :
केवळ सायकल चालविण्याचा उपक्रम नव्हे, तर पर्यावरण संवर्धनाचा ध्यास, निरोगी जीवनाचा संदेश, सामाजिक एकात्मतेची प्रेरणा आणि विठ्ठलभक्तीचा अखंड गजर अशा चारही मूल्यांचा संगम ठरलेली निसर्गरंग फाउंडेशन, सांगलीची "सांस्कृतिक नगरी सांगली ते विठ्ठल नगरी पंढरपूर" ही ऐतिहासिक 'निसर्ग-सायकलवारी' यंदा दिमाखात दहाव्या वर्षात पदार्पण करीत आहे.
गेल्या दशकभरात हजारो पर्यावरणप्रेमी, युवक, कलाकार, साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते आणि विठ्ठलभक्तांना एका हरित धाग्यात गुंफणाऱ्या या अनोख्या चळवळीने आता जनआंदोलनाचे स्वरूप धारण केले आहे. "निसर्गराया भेटूया... चला, विठ्ठल पेरूया..." या प्रेरणादायी घोषवाक्याखाली मंगळवार, २१ जुलै ते शनिवार, २५ जुलै २०२६ (आषाढी एकादशी) या कालावधीत दहाव्या वर्षाची विशेष सायकलवारी संपन्न होणार असून, यंदाचा उपक्रम अधिक व्यापक, अधिक लोकसहभागाचा आणि अधिक प्रेरणादायी स्वरूपात आयोजित करण्यात येत आहे.
दहा वर्षांपूर्वी काही निसर्गप्रेमींच्या मनात रुजलेले एक छोटेसे स्वप्न आज पर्यावरण रक्षणाची, आरोग्यदायी जीवनशैलीची आणि सामाजिक बांधिलकीची प्रभावी लोकचळवळ बनले आहे. प्लास्टिकमुक्त जीवन, वृक्षसंवर्धन, जलसंवर्धन, सायकल संस्कृतीचा प्रसार, प्रदूषणमुक्त पर्यावरण आणि विठ्ठलभक्तीचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचे कार्य निसर्गरंग फाउंडेशन सातत्याने करत आहे.
ही सायकलवारी म्हणजे केवळ सांगली ते पंढरपूरचे अंतर पार करणे नाही; ती माणसामाणसांतील नाती दृढ करणारी, निसर्गाशी संवाद साधणारी, शरीर-मन निरोगी ठेवणारी, पर्यावरणाबद्दल उत्तरदायित्व निर्माण करणारी आणि वारकरी परंपरेतील समतेचा व मानवतेचा संदेश नव्या पिढीपर्यंत पोहोचविणारी प्रेरणायात्रा आहे.
गेल्या दहा वर्षांत या उपक्रमाने असंख्य युवकांना सायकलकडे वळविले, पर्यावरणपूरक जीवनशैलीचा स्वीकार करण्याची प्रेरणा दिली आणि समाजहितासाठी एकत्र येण्याची नवी ऊर्जा निर्माण केली. त्यामुळे ही सायकलवारी आता केवळ एका संस्थेचा कार्यक्रम न राहता सांगलीच्या सांस्कृतिक व सामाजिक ओळखीचा अभिमानास्पद उपक्रम बनली आहे.
यंदाच्या विशेष पर्वात पर्यावरण जनजागृती, वृक्षसंवर्धनाचे संदेश, स्वच्छता अभियान, सामाजिक प्रबोधन, सांस्कृतिक सादरीकरणे आणि विठ्ठल नामस्मरण यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळणार आहे. विविध क्षेत्रांतील मान्यवर, पर्यावरणप्रेमी, कलाकार, साहित्यिक, डॉक्टर, शिक्षक, पत्रकार, उद्योजक तसेच मोठ्या संख्येने युवक या हरित यात्रेत सहभागी होणार आहेत.
निसर्गरंग फाउंडेशनचे अध्यक्ष कुलदीप देवकुळे यांनी सर्व नागरिकांना या ऐतिहासिक दहाव्या वर्षाच्या सायकलवारीत सहभागी होण्याचे आवाहन करताना म्हटले, "ही केवळ सायकलवारी नाही; हा निसर्गाशी केलेला मैत्रीचा करार आहे. ही भविष्यातील पिढ्यांसाठी हरित पृथ्वी जपण्याची सामूहिक प्रतिज्ञा आहे. चला... निसर्गाला वंदन करूया, विठ्ठलनामाचा गजर करूया आणि पर्यावरण संवर्धनाच्या या लोकचळवळीला अधिक बळ देऊया."
दहा वर्षांच्या यशस्वी वाटचालीनंतर नव्या दशकात प्रवेश करणारी निसर्गरंग फाउंडेशनची 'निसर्ग-सायकलवारी' पर्यावरण, संस्कृती, आरोग्य आणि अध्यात्म यांचा संदेश अधिक व्यापकपणे समाजात पोहोचविण्यास सज्ज झाली असून, यंदाचा हा उपक्रम सांगली जिल्ह्याच्या सामाजिक-सांस्कृतिक इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.

