जतवार्ता न्यूज नेटवर्क;
जत तहसिल कार्यालय प्रशासकीय भवन, जत येथे भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात व देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. या वेळी ध्वजारोहण उपविभागीय अधिकारी अजयकुमार नष्टे यांच्या हस्ते करण्यात आले. राष्ट्रगीताच्या सन्मानपूर्ण गजरात उपस्थितांनी तिरंग्याला मानवंदना दिली.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार गोपीचंद पडळकर उपस्थित होते. यांच्यासह उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले, तहसिलदार प्रवीण धानोरकर, पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर, गटविकास अधिकारी मुक्तेश्वर माडगुळकर, जत नगरपरिषद मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. तसेच विविध प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी, शिक्षक, विद्यार्थी, समाजसेवक, पत्रकार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला संविधानाचे सामूहिक वाचन घेण्यात आले. यानंतर उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. स्वातंत्र्य सैनिक, वीर माता-पिता यांचाही सन्मान करण्यात आला. आणीबाणी काळात शिक्षा भोगलेले सुभाष मोतीलाल मालाणी यांचा विशेष सत्कार करून त्यांच्या त्यागाला मानवंदना देण्यात आली.
क्रीडा क्षेत्रात सलग चार वर्षे जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये तालुक्याला प्रथम क्रमांक मिळवून दिल्याबद्दल गटशिक्षणाधिकारी राम फरकांडे यांचा गौरव करण्यात आला. तसेच हर्षवर्धन कोळी, राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत चॅम्पियन ठरलेल्या श्रेया हिप्परगी, दिव्यांग गटातून लांब उडी स्पर्धेत राज्यस्तरीय निवड झालेल्या युवराज लेंगरे यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.



