जतवार्ता न्यूज नेटवर्क :
सांगली जिल्हा परिषद व जत पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीत डफळापूर जिल्हा परिषद गटात काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली आहे. सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार मा. विक्रमसिंह सावंत यांनी रविवारी या गटातील तब्बल ११ गावांचा झंझावाती प्रचार दौरा करत काँग्रेस उमेदवारांच्या प्रचाराला वेग दिला. “सामान्य माणसाच्या हक्कासाठी आणि डफळापूर गटाच्या सर्वांगीण विकासासाठी काँग्रेसच्या उमेदवारांना बहुमताने विजयी करा,” असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
धावडवाडी येथून प्रचाराचा नारळ फोडून सावंत यांनी दौऱ्याची सुरुवात केली. त्यानंतर हिवरे, डोर्ली, अंकले, बाज, बेळुंखी, कुडणूर, शिंगणापूर, शेळकेवाडी आणि जिरेयाळ आदी गावांमध्ये भेटी देत त्यांनी ग्रामस्थांशी थेट संवाद साधला. प्रत्येक गावात त्यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.
यावेळी बोलताना मा. आ. विक्रमसिंह सावंत म्हणाले की, भाजप जातिवादाचे राजकारण करत असून जत तालुक्यात माणसा-माणसात दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. काँग्रेस पक्षाने मात्र नेहमीच विकासाचे राजकारण केले आहे. आमदार असताना जत तालुक्याच्या विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न करून पाणीप्रश्न, रस्ते, वीज आदी मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठी शेकडो कोटी रुपयांचा निधी आणला. विशेषतः डफळापूर गटासाठी रस्ते व विजेच्या कामांसाठी सर्वाधिक निधी दिल्याचा दावा त्यांनी केला.
डफळापूर गटाच्या विकासासाठी काँग्रेसने सक्षम व खंबीर नेतृत्व दिले असल्याचे सांगत सावंत म्हणाले की, जिल्हा परिषद उमेदवार सौ. काजल रमेश दुधाळ, डफळापूर पंचायत समिती गणातून श्री. बाबासाहेब बाळू माळी आणि बाज गणातून सौ. सारिका रोहित गडदे यांच्या विजयामुळे ग्रामीण भागातील रस्ते, पाणीपुरवठा व शेतीसंबंधी प्रश्नांना प्राधान्याने न्याय मिळेल.
यावेळी डफळापूर पंचायत समिती गणाचे उमेदवार श्री. बाबासाहेब माळी यांनी मतदारांना संबोधित करताना सांगितले की, “तुमचे मत वाया जाऊ देणार नाही. तुमच्या कोणत्याही अडचणीला मी धावून येईन. माझ्या रूपाने दिलेले मत चुकीच्या माणसाला गेले, असे कधीही वाटू देणार नाही,” असे आश्वासन देत त्यांनी काँग्रेसच्या उमेदवारांना मतदान करण्याची विनंती केली.
सत्ताधाऱ्यांवर कडाडून टीका करत सावंत म्हणाले की, गेल्या काही वर्षांत सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले. महाविकास आघाडीच्या माध्यमातून जनतेला न्याय देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. गावोगावी महिला, तरुण व ज्येष्ठ नागरिकांनी औक्षण करत सावंत यांचे स्वागत केले, यावरून डफळापूर गटात परिवर्तनाचे वारे वाहत असल्याचे स्पष्ट होत आहे.
शेवटी, शनिवार दि. ७ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मतदानासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहून काँग्रेसच्या उमेदवारांना विक्रमी मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन सावंत यांनी केले.


