yuva MAharashtra स्वामी समर्थ प्रकटदिनानिमित्त जत येथे कीर्तनासह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

स्वामी समर्थ प्रकटदिनानिमित्त जत येथे कीर्तनासह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

जत वार्ता न्यूज
By -

जत/प्रतिनिधी :
     स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकटदिनानिमित्त शुक्रवारी जत येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून सुप्रसिद्ध कीर्तनकार अनिल महाराज तडवळे यांच्या कीर्तनाचा कार्यक्रमही होणार आहे. या कार्यक्रमांचा लाभ घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री. स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट जत व वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष बापूसाहेब पवार यांनी केले आहे.
     श्री. स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने दरवर्षी विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. कोरोना काळातही या ट्रस्टच्या माध्यमातून महिनाभर कोविड रुग्णांच्या नातेवाईकांना मोफत अल्पोपहार व पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले होते.
     तसेच या ट्रस्टच्या माध्यमातून दरवर्षी महाराष्ट्रातील नवोदित कीर्तनकारांसाठी ‘गजर कीर्तनाचा व सोहळा आनंदाचा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. या कार्यक्रमातून नवोदित कीर्तनकार आणि कथाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देत त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम केले जात असल्याचे ट्रस्टकडून सांगण्यात आले.
     दर पौर्णिमेला पहाटे स्वामींचा अभिषेक, महापूजा व आरती, सकाळी १० ते १२ या वेळेत रामपूर येथील वीरशैव भजनी मंडळाचा भजन कार्यक्रम, त्यानंतर दुपारी श्रींची आरती, स्वामी समर्थ चरणी पुष्पार्पण आणि उपस्थित भक्तांसाठी महाप्रसाद वाटप असे कार्यक्रम नियमितपणे आयोजित केले जातात.
     दरम्यान, ट्रस्टचे विश्वस्त उपाध्यक्ष अशोक तेली, सचिव श्रीकृष्ण पाटील, शहाजीबापू भोसले, मोहन पवार, दादासाहेब जाधव, सदाशिव जाधव, गणेश सावंत, दीपक पाटणकर, सतीश चव्हाण (मिस्त्री), लक्ष्मण मोरे, अतुल मोरे, वसंत उगले, समर्थ पवार, ह. भ. प. कु. राजनंदिनी पवार आदींच्या सहकार्याने ट्रस्टचे कार्य सुरू आहे. तसेच सागर महाराज बोराटे यांच्या प्रेरणेने लवकरच ट्रस्टच्या माध्यमातून सभामंडप उभारणी व वारकरी शिक्षण संस्था सुरू करण्याचा मानस असल्याचेही सांगण्यात आले.
     स्वामी समर्थ महाराजांचा प्रकटदिन शुक्रवार, २० मार्च २०२६ रोजी साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी पहाटे अभिषेक महापूजा व आरती, सकाळी १० ते १२ या वेळेत ह.भ.प. अनिल महाराज तडवळे (आटपाडी) यांचे कीर्तन, दुपारी १२ वाजता आरती व स्वामी समर्थ चरणी पुष्पार्पण आणि त्यानंतर उपस्थित भाविकांसाठी अन्नप्रसाद वाटप असे कार्यक्रम पार पडणार आहेत.
     या सर्व कार्यक्रमांना भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष बापूसाहेब पवार यांनी केले आहे.