yuva MAharashtra महिला दिनानिमित्त उद्या विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान | जत नगरपरिषदेचा उपक्रम, सभापती सुप्रिया बामणे व नगरसेविका काजल काळे यांची यांची पत्रकार परिषदेत माहिती

महिला दिनानिमित्त उद्या विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान | जत नगरपरिषदेचा उपक्रम, सभापती सुप्रिया बामणे व नगरसेविका काजल काळे यांची यांची पत्रकार परिषदेत माहिती

जत वार्ता न्यूज
By -
 

जतवार्ता न्यूज नेटवर्क | jath; 
     जागतिक महिला दिनानिमित्त जत नगरपरिषदेकडून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीप्रित्यर्थ विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. अशी माहिती महिला बाल कल्याण सभापती सौ. सुप्रिया योगेश बामणे व नगरसेविका काजल काळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 
     आशा वर्कर, सफाई कर्मचारी, महिला बचत गटातील उद्योजिका, पोलीस दलातील महिला दक्षता पथक तसेच शासकीय रुग्णालयातील सेविका अशा विविध क्षेत्रांत कार्यरत महिलांचा यावेळी सन्मान केला जाणार आहे. महिलांना मार्गदर्शन मिळावे यासाठी विशेष व्याख्यान व मनोरंजनाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. 
     'उंच माझा झोका' या विषयावर प्राचार्य डॉ. अर्चना अरुण चव्हाण (थोरात) या प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत. हा कार्यक्रम मंगळवार, दि. १० मार्च २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता जत येथील साईप्रकाश मंगल कार्यालय येथे होणार आहे.
     या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दै. तरुण भारतचे संपादक  शिवराज आप्पासाहेब काटकर राहणार असून उद्घाटन सामाजिक कार्यकर्त्या सौ. वर्षाताई विक्रमसिंह (दादा) सावंत यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी नगराध्यक्ष डॉ. रविंद्र शिवशंकर आरळी, उपनगराध्यक्ष विक्रम ताड, मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड यांच्यासह  सामाजिक कार्यकर्त्या गायत्रीदेवी सुजय शिंदे, मोहिनी स्वप्निल शिंदे, लक्ष्मी आण्णाप्पा कैकाडी, स्नेहल परशुराम मोरे, सुनेरा फिरोज नदाफ, डॉ. रेणुका रविंद्र आरळी, मुस्कान इम्रान गवंडी, सीमा संतोष पट्टणशेट्टी, प्रणिता राजू यादव,  महिला व बालकल्याण उपसभापती डॉ. वीणा शंकर तंगडी, ज्योती विकास माने, संगीता अविनाश सोनुले, नंदिनी सोमेश्वर मठपती, कोमल संतोष कांबळे, मधुरा मोहन कुलकर्णी, उज्वला महादेव कोळी, शिल्पा मिथुन भिसे, तृप्ती गौतम ऐवाळे, स्वाती प्रमोद हिरवे, रूपाली राजकुमार साळे आदी मान्यवरही उपस्थित राहणार आहेत.
     कार्यक्रमाचे संयोजन महिला व बालविकास सभापती सौ. सुप्रिया योगेश बामणे, नगरसेविका काजल राहुल काळे, अनुसया प्रकाश माने, निलाबाई कृष्णा कोळी, शबाना मिरासाहेब जमखंडी आणि अर्चना बाजी केंगार यांनी केले आहे. तसेच कार्यक्रमानंतर महिलांसाठी खास मनोरंजन म्हणून झी-टीव्ही फेम सिनेअभिनेते वृषभ अक्कीवाटे यांचा “खेळ पैठणीचा” हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून सर्व महिलांसाठी अल्पोपहाराचीही व्यवस्था करण्यात आली आहे. 
     या कार्यक्रमासाठी महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जत नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती सौ. सुप्रिया योगेश बामणे यांनी पत्रकार परिषदेत केले.
विविध क्षेत्रातील महिलांचा होणार सन्मान;
     जागतिक महिला दिनानिमित्त आशा वर्कर, सफाई कर्मचारी, महिला बचत गटातील उद्योजिका, पोलीस दलातील महिला दक्षता पथक तसेच शासकीय रुग्णालयातील सेविका अशा विविध क्षेत्रांत कार्यरत महिलांचा जत नगरपरिषदेतर्फे विशेष सन्मान करण्यात येणार आहे. या माध्यमातून समाजात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांच्या कार्याचा गौरव केला जाणार आहे.