जतवार्ता न्यूज नेटवर्क | jath :
जत नगरपरिषदेने आरक्षित केलेल्या सर्वेनंबर ५१०/२ ब या खुल्या जागेवर दोन एकर क्षेत्रात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक व सुसज्ज उद्यान उभारण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी जतचे उपनगराध्यक्ष विक्रम ताड यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांना दिलेल्या लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात ताड यांनी नमूद केले आहे की, जत शहरात ग्रामपंचायत अस्तित्वात असताना शिवाजीपेठ येथे छत्रपती शिवाजी महाराज उद्यान होते. मात्र जागेच्या वादामुळे आणि जाणीवपूर्वक झालेल्या दुर्लक्षामुळे हे उद्यान नामशेष झाले. परिणामी सध्या जत शहरातील नागरिक, महिला, लहान मुले व ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी फिरण्यासाठी, विरंगुळ्यासाठी किंवा मनोरंजनासाठी एकही सार्वजनिक उद्यान उपलब्ध नाही.
जत शहराच्या गावठाण हद्दीत सर्वेनंबर ५१०/२ ब / २/१ अ / अ मध्ये सुमारे ७ हेक्टर २२ आर क्षेत्र उपलब्ध आहे. त्यापैकी दोन एकर जागा नगरपरिषदेने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक व उद्यानासाठी आरक्षित केली असून ती प्रस्तावित आहे. सध्या संभाजी महाराजांचा बलिदानमास सुरू असल्याने या स्मारकाच्या उभारणीसाठी शासनाकडून विशेष बाब म्हणून मंजुरी मिळवून द्यावी, तसेच मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.
प्रस्तावित दोन एकर जागेत संभाजी महाराजांचे भव्य स्मारक, वॉकिंग ट्रॅक, लहान मुलांसाठी खेळणी उद्यान, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र, पिण्याच्या पाण्याची सुविधा, स्वच्छतागृह, आरोग्यकेंद्र तसेच आकर्षक बागबगीचा उभारण्याचा मानस व्यक्त करण्यात आला आहे. या सर्व सुविधा उभारण्यासाठी आवश्यक तेवढा जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून द्यावा, असे ताड यांनी निवेदनात म्हटले आहे.
या उद्यानामुळे जत शहराच्या वैभवात भर पडेल आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रेरणादायी कार्याची ओळख नव्या पिढीला होईल. तरुण पिढीला सकारात्मक दिशा मिळावी, या उद्देशाने स्मारक व उद्यानाची उभारणी तातडीने प्रत्यक्षात आणावी, अशी मागणी उपनगराध्यक्ष विक्रम ताड यांनी आमदार पडळकर यांच्याकडे केली आहे.

