yuva MAharashtra मराठा समाज सांस्कृतिक भवन व छत्रपती शिवाजी महाराज उद्यानासाठी दोन एकर जागा द्या : नगरपरिषदेकडे मराठा समाजाची मागणी

मराठा समाज सांस्कृतिक भवन व छत्रपती शिवाजी महाराज उद्यानासाठी दोन एकर जागा द्या : नगरपरिषदेकडे मराठा समाजाची मागणी

जत वार्ता न्यूज
By -

जत/प्रतिनिधी :
     जत नगरपरिषद हद्दीत मराठा समाजासाठी सांस्कृतिक भवन तसेच छत्रपती शिवाजी महाराज उद्यान उभारण्यासाठी दोन एकर जागा उपलब्ध करून द्यावी, अशी लेखी मागणी मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने जत नगरपरिषदेकडे केली आहे.
     शहरात विविध समाजांच्या समाजमंदिरांसाठी जागा उपलब्ध असताना मराठा समाजासाठी स्वतंत्र सांस्कृतिक भवन नसल्याची खंत यावेळी व्यक्त करण्यात आली. मराठा समाजाचे आमदार, खासदार, मंत्री तसेच प्रशासकीय सेवेत असलेले अधिकारी असूनही तालुका स्तरावर समाजासाठी सांस्कृतिक भवन उभारले गेलेले नाही. समाजातील विविध सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांसाठी स्वतंत्र जागेची आवश्यकता असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
     तसेच रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने शहरात भव्य उद्यान उभारण्यासाठी नगरपरिषदेकडून दोन एकर जागा उपलब्ध करून देण्याचीही मागणी करण्यात आली आहे. यापूर्वी हराळे समाज वसाहतीलगत शासकीय ओढापात्रात नगरपरिषदेकडून लाखो रुपये खर्च करून छत्रपती शिवाजी महाराज उद्यान उभारण्यात आले होते. मात्र जागेच्या मालकीच्या वादामुळे व तत्कालीन ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे हे उद्यान पूर्णतः अस्तित्वहीन झाल्याची स्थिती निर्माण झाली आहे.
     यानंतर जत–सांगली रस्त्यालगत सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयाच्या बाजूस असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जागेवर नगरपरिषदेकडून पुन्हा लाखो रुपये खर्च करून छत्रपती शिवाजी महाराज उद्यान उभारण्यात आले. मात्र सध्या नगरपरिषदेच्या दुर्लक्षामुळे या उद्यानाचीही दुरावस्था झाली आहे. उद्यानातील झाडे नष्ट झाली असून लहान मुलांसाठी बसविण्यात आलेली खेळणी गंजून निकामी झाली आहेत. तसेच बसण्यासाठी ठेवण्यात आलेले सिमेंटचे बाकही मोडले आहेत.
     दरम्यान, या जागेवर नगरपरिषदेची नवीन इमारत उभारण्याचा प्रस्ताव असल्याने छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाचे अस्तित्वच नष्ट होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे शहरात नव्याने दोन एकर जागा देऊन छत्रपती शिवाजी महाराज उद्यान तसेच मराठा समाज सांस्कृतिक भवन उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी उपनगराध्यक्ष विक्रम ताड यांनी मराठा समाजाच्या वतीने दिलेल्या निवेदनात केली आहे.
     यावेळी मराठा सेवासंघाचे जत तालुका अध्यक्ष राजेंद्र पाटील, जत दूरदर्शन पतसंस्थेचे चेअरमन दीपक शिंदे, डॉ. महेश भोसले, बाळासाहेब माने, मछिंद्र बाबर आदी उपस्थित होते.