हभप तुकाराम बाबा महाराज यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी; आठ दिवसांत निर्णय न झाल्यास आंदोलनाचा इशारा
जत | प्रतिनिधी :
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या राज्यातील सुमारे एक लाख ३४ हजार युवा प्रशिक्षणार्थींना शासकीय भरती प्रक्रियेत प्राधान्य देण्यात यावे, त्यांच्यासाठी दहा टक्के आरक्षण लागू करावे तसेच सहा लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून द्यावे, अन्यथा सांगली येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती तथा श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे प्रमुख हभप तुकाराम बाबा महाराज यांनी दिला. यासंदर्भात त्यांनी सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी राज्य शासनावर युवा प्रशिक्षणार्थींकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला.
निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील युवक-युवतींना प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळावा आणि रोजगाराच्या संधी वाढाव्यात या उद्देशाने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू करण्यात आली होती. सुरुवातीला सहा महिन्यांचा असलेला प्रशिक्षण कालावधी आंदोलनानंतर शासनाने आणखी पाच महिन्यांनी वाढवून एकूण अकरा महिने केला. मात्र हा कालावधी संपल्यानंतर हजारो प्रशिक्षणार्थी पुन्हा बेरोजगार झाले असून त्यांच्या भविष्याबाबत शासनाने कोणतेही ठोस धोरण जाहीर केलेले नाही.
या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील ३६ जिल्ह्यांत विविध स्वरूपात आंदोलने करण्यात आली होती. या आंदोलनाची दखल घेत मंत्री भरत गोगावले, मंत्री उदय सामंत तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले होते. तसेच संबंधित विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात युवा प्रशिक्षणार्थींसाठी दहा टक्के आरक्षण आणि सहा लाख रुपयांच्या बिनव्याजी कर्जाची घोषणा केली होती. मात्र अद्याप त्यासंदर्भात कोणताही शासन निर्णय किंवा अंमलबजावणी झालेली नसल्याचे तुकाराम बाबा यांनी सांगितले.
सध्या विविध शासकीय विभागांमध्ये भरती प्रक्रिया सुरू असल्याने त्या भरतीत मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थींना प्रथम प्राधान्य देण्यात यावे. तसेच दहा टक्के राखीव जागा आणि बिनव्याजी कर्जाबाबत तातडीने शासन निर्णय काढून सर्व विभागांना त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश द्यावेत, अशी प्रमुख मागणी त्यांनी केली.
मागण्या पुढील आठ दिवसांत मान्य न झाल्यास सांगलीतील क्रांतिसिंह नाना पाटील चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात येईल. त्यानंतर स्टेशन चौक येथे आमरण उपोषण सुरू करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी संजय धुमाळ, जयदीप माने, समर्थ राठोड, विशाल राठोड, सौरभ रोडे, प्रतीक गाडे, प्रणंद शिंदे यांच्यासह युवा प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

