जत | प्रतिनिधी :
जत शहरातील पाणीपुरवठा, जलवाहिनीतील गळती, रस्त्यांची दुरावस्था तसेच विकासकामांतील कथित अनियमिततेची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी जत तालुका अहिल्यादेवी समाज प्रबोधिनी मंचाचे अध्यक्ष प्रकाश व्हनमाणे यांनी जिल्हाधिकारी, सांगली यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, जत तालुक्यात सध्या पाणीटंचाईची तीव्र समस्या निर्माण झाली असून सुमारे ६० हजार लोकसंख्या असलेल्या शहराला बिरनाळ तलावातून पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, शहरातील पाणीपुरवठा करणाऱ्या पाइपलाइनला अनेक ठिकाणी गळती लागल्याने लाखो लिटर पाणी वाया जात आहे. याबाबत यापूर्वीही नगरपरिषद प्रशासनाकडे निवेदन देऊन लक्ष वेधण्यात आले होते. मात्र, अद्यापही कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
शहरासाठी नवीन पाणीपुरवठा पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू असले तरी ते मंजूर अंदाजपत्रकानुसार व दर्जेदार पद्धतीने होत आहे की नाही, याची पाहणी संबंधित अधिकारी किंवा पदाधिकाऱ्यांनी केलेली नाही, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या कामात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा संशय व्यक्त करत संपूर्ण कामाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
पाणीपुरवठा योजनेच्या कामासाठी शहरातील अनेक रस्ते खोदून ठेवण्यात आल्याने नागरिक व वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे संबंधित कामांची गुणवत्ता, आर्थिक व्यवहार आणि प्रशासनाच्या भूमिकेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. या निवेदनाच्या प्रती उपविभागीय अधिकारी, तहसीलदार तसेच जत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांनाही देण्यात आल्या आहेत.

