yuva MAharashtra हालचाल रजिस्टरवर उद्याच्या तारखेची सही; जत पंचायत समितीतील कारभारावर प्रश्नचिन्ह | सभापतींचा संताप; वरमाईच असे तर वराडींचे काय?

हालचाल रजिस्टरवर उद्याच्या तारखेची सही; जत पंचायत समितीतील कारभारावर प्रश्नचिन्ह | सभापतींचा संताप; वरमाईच असे तर वराडींचे काय?

जत वार्ता न्यूज
By -

जत | प्रतिनिधी :
     जत पंचायत समितीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामकाजावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पंचायत समितीच्या ग्राम विस्तार अधिकारी विभागातील एका अधिकाऱ्याने हालचाल (मुव्हमेंट) रजिस्टरवर प्रत्यक्ष दिनांक येण्यापूर्वीच उद्याच्या तारखेची सही केल्याचा प्रकार समोर आला असून, या घटनेमुळे कार्यालयीन शिस्त व प्रशासनाच्या पारदर्शकतेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
     पंचायत समिती कार्यालयात अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कार्यालयाबाहेरील दौऱ्यांची तसेच उपस्थितीची नोंद हालचाल रजिस्टरमध्ये केली जाते. मात्र, या रजिस्टरमध्ये एका ग्राम विस्तार अधिकाऱ्याने पुढील दिवसाच्या तारखेवरच आगाऊ सही केल्याचे निदर्शनास आल्याने कार्यालयीन नियमांचे उल्लंघन झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.
     सरकारी कार्यालयांमध्ये प्रत्येक नोंद ही संबंधित दिवशीच करण्यात येणे अपेक्षित असते. मात्र, प्रत्यक्ष तारीख येण्यापूर्वीच सही झाल्यामुळे नोंदींच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यामुळे अधिकारी प्रत्यक्षात कार्यालयात होते की नाही, तसेच दौऱ्यांच्या नोंदी कितपत अचूक आहेत, याबाबतही शंका व्यक्त केली जात आहे.
     दरम्यान, पंचायत समितीतील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार सुरू असल्याच्या तक्रारी यापूर्वीही समोर आल्या आहेत. वेळेवर कार्यालयात उपस्थित न राहणे, नागरिकांची कामे प्रलंबित ठेवणे आणि कार्यालयीन नियमांकडे दुर्लक्ष करणे, अशा प्रकारांमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण असल्याचे बोलले जात आहे.
     या प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घेऊन हालचाल रजिस्टरची तपासणी करावी, संबंधित अधिकाऱ्यांकडून खुलासा मागवावा आणि नियमभंग झाल्याचे निष्पन्न झाल्यास शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

नोंदींच्या विश्वासार्हतेवर प्रश्न;
     हालचाल रजिस्टर हे शासकीय कार्यालयातील महत्त्वाचे अभिलेख मानले जातात. त्यामध्ये भविष्यातील तारखेवर आगाऊ सही झाल्याचे आढळल्यास संबंधित नोंदींची विश्वासार्हता संशयाच्या भोवऱ्यात सापडते. त्यामुळे अशा प्रकारांकडे वरिष्ठ प्रशासनाने गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे.

सभापतींचा संताप; वरमाईच असे तर वराडींचे काय?
     जत पंचायत समितीच्या ग्रामविकास विभागात तीन ग्राम विस्तार अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल ९२ ग्रामपंचायत अधिकारी कार्यरत आहेत. अशा परिस्थितीत वरिष्ठ अधिकारीच कार्यालयीन नियमांचे उल्लंघन करत असतील, तर त्यांच्या अधिपत्याखाली काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची काय अवस्था असेल, असा संतप्त सवाल पंचायत समितीच्या सभापती अर्चना पाटील यांनी उपस्थित केला.
     या प्रकाराची गांभीर्याने दखल घेत संबंधित ग्राम विस्तार अधिकाऱ्यांवर तातडीने चौकशी करून कडक शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले. पंचायत समितीतील कामकाजात शिस्त आणि पारदर्शकता राखण्यासाठी कोणत्याही प्रकारची हयगय सहन केली जाणार नसल्याचा इशाराही सभापती पाटील यांनी दिला.