yuva MAharashtra वृक्षचळवळ हीच जतच्या दुष्काळावर दीर्घकालीन उपाययोजना : माणिकराव गायकवाड | 'ओंम' स्विमिंग ग्रुपकडून बिरनाळ तलाव परिसरात ५० वृक्षांची लागवड | संगोपनाचीही घेतली जबाबदारी

वृक्षचळवळ हीच जतच्या दुष्काळावर दीर्घकालीन उपाययोजना : माणिकराव गायकवाड | 'ओंम' स्विमिंग ग्रुपकडून बिरनाळ तलाव परिसरात ५० वृक्षांची लागवड | संगोपनाचीही घेतली जबाबदारी

जत वार्ता न्यूज
By -
 

जत, प्रतिनिधी ;
     दुष्काळाची झळ वर्षानुवर्षे सहन करणाऱ्या जत तालुक्याला कायमस्वरूपी दिलासा मिळवून द्यायचा असेल, तर केवळ पावसाची वाट न पाहता मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे वृक्षांचे संगोपन करणे ही काळाची गरज आहे. झाडे ही केवळ पर्यावरणाची शोभा नसून पावसाचे प्रमाण वाढवणे, भूजल पातळी टिकवून ठेवणे, मातीची धूप रोखणे, तापमान नियंत्रणात ठेवणे आणि जैवविविधता जपणे यासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने दरवर्षी किमान एक तरी झाड लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन जत एसटी महामंडळाचे सेवानिवृत्त अधिकारी माणिकराव गायकवाड यांनी केले.
     जागतिक तापमानवाढ, कमी होत चाललेले पर्जन्यमान आणि वाढती वृक्षतोड यामुळे जतसारख्या दुष्काळी भागांवर गंभीर परिणाम होत आहेत. भविष्यातील पिढ्यांना हिरवागार आणि समृद्ध परिसर मिळावा यासाठी वृक्षलागवड ही लोकचळवळ बनणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
     याच सामाजिक जाणीवेतून जत शहरातील 'ओंम' स्विमिंग ग्रुपच्या वतीने बिरनाळ तलाव परिसरात विविध प्रकारच्या ५० वृक्षांची लागवड करण्यात आली. यामध्ये लिंब, चिंच, पिंपळ, वड, रबर ट्री, निलगिरी आदी आठ ते दहा फूट उंचीच्या रोपांचा समावेश आहे. तलाव परिसर भविष्यात हिरवागार व्हावा आणि पर्यावरण संवर्धनाला चालना मिळावी, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.
     जत एसटी आगारातील सेवानिवृत्त अधिकारी तथा ओंम स्विमिंग ग्रुपचे संस्थापक माणिकराव गायकवाड आणि सेवानिवृत्त पाटबंधारे अधिकारी आण्णासाहेब हारगे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या २३ वर्षांपासून हा ग्रुप कार्यरत आहे. पोहण्याचे प्रशिक्षण, नियमित व्यायाम, आरोग्यदायी जीवनशैली, लवकर उठण्याचे महत्त्व याबाबत जनजागृती करण्याबरोबरच सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम राबविण्यात हा ग्रुप नेहमीच पुढाकार घेत असतो.
    यावर्षी वृक्षलागवडीचा संकल्प करत बिरनाळ तलाव परिसराची निवड करण्यात आली. विशेष म्हणजे केवळ झाडे लावून न थांबता सर्व वृक्षांचे नियमित पाणी, संरक्षण आणि संगोपन करण्याची जबाबदारी ग्रुपच्या सदस्यांनी स्वीकारली आहे. त्यामुळे हा उपक्रम केवळ औपचारिक न राहता पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने एक आदर्श पाऊल ठरत आहे.
    या उपक्रमात माणिकराव गायकवाड, आण्णासाहेब हारगे, पापा भोसले, संभाजी कोडग, मलाप्पा मेडीदार, संजय हत्ती, शशी इंगवले, अजित घोंगडे, खंडूतात्या जाधव, काकतीकर, दिलीपबापू सोलापुरे, संजय लोहार, इराप्पा किट्टद, मेजर महादेव कोळी, किरण जाधव, कृष्णा कोळी, भैय्या कुलकर्णी, महादेव माने, प्रा. अवताडे, प्रा. तुराई, प्रा. कुलाळ, प्रा. मगदूम, अनिल बन्ने, एन. टी. चव्हाण, रमेश राठोड, सार्थक जाधव, आरुष राठोड, राजू मोटगी आदी सदस्य सहभागी झाले होते.
     दरम्यान, शहरातील नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करत, "एक झाड – एक जबाबदारी" हा संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचविण्यासाठी अशा वृक्षचळवळी अधिक व्यापक प्रमाणात राबविण्याची अपेक्षा व्यक्त केली.